कोची- कोझीकोडे विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या विमान अपघातात मरण पावलेल्या 18 प्रवाशांपैकी एकजण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या मदत कार्यात सहभागी झालेल्या सर्वांची वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी शनिवारी दिली.
या मदत कार्यात सहभागी झालेल्या सर्वांनी स्वयंविलगीकरण करावे. त्या सर्वांची राज्य सरकारतर्फे चाचणी घेण्यात येईल. या सर्वांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधवा. आरोग्य विभागातर्फे त्यांची यादी बनवण्याचे काम सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.
वंदे भारत मिशनमध्ये परदेशातून 9.3 लाख भारतीयांना परत आणण्यात आले आहे. त्यातील एक विमान दुबईहून शुक्रवारी परतले. कोझीकोडे विमानतळावर पावसामुळे ते घसरल्याने 35 फूट दरीत कोसळले त्यात विमानाचे दोन तुकडे झाले.
केंद्र सरकारकडून चौकशी सुरू
केंद्राने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एअर इंडिया आणि विमान अपघात अन्वेषण संस्थेच्या वतीने या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. धावपट्टीवर विमान उतरत असताना ते पूर्ण वेगात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष नागरी उड्डाण माहासंचालकांनी आपल्या सुरवातीच्या तपासातून काढला आहे. विमानाचा डिजिटल फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. ते दिल्लीला आणून पुढील तपास करण्यात येईल.