हडपसर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व माजी आमदारांनी आपले एक महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी म्हणून द्यावे ,असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले आहे.
या अनुषंगाने शिवरकर यांनी स्वतः पन्नास हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली असून जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पन्नास हजारांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत .कोरोनाचा मुकाबला सर्वांनीच एकजुटीने करायचा आहे. त्यात राज्यभरातील माजी विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य यांचेही योगदान महत्त्वाचे आहे .त्यामुळे त्यांनीही मदत दिल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठी भर पडू शकते आणि हा निधी राज्य शासनाच्या अडचणीच्या काळात उपयोगी पडू शकतो ,असेही बाळासाहेब शिवरकर यांनी या आवाहन पत्रात नमूद केले आहे. यासंदर्भात आपण व्यक्तिशः विविध माजी आमदारांशी संपर्क साधत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यात मदत करु इच्छिणाऱ्यांसाठी नुकतीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नव्या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात इच्छुकांनी सढळ हाताने मदत जमा करावी ,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याच आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझे एक महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहे. माझ्या संपर्कातील इतर काही माजी आमदारांनाही यासाठी बोलत असून काहींनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
– बाळासाहेब शिवरकर, माजी राज्यमंत्री