उद्योगनगरीत ‘अवघा रंग एक झाला’ संत तुकाराम महाराज पालखी सोहळा : वरुणराजाच्या साक्षीने पालखीचे उत्साहात स्वागत

पिंपरी :
धन्य आजि दिन!
जाले संतांचे दर्शन !!
जाली पापा-तापा तुटी!
दैन्य गेले उठाउठी!!
जाले समाधान!
पायी विसावले मन!!
तुका म्हणे आले घरा!
तोचि दिवाळी दसरा!!
या उक्ती प्रमाणे उद्योगनगरीत तुकोबांच्या पालखीचे दिमाखात स्वागत करण्यात आले. लहान-थोर, स्त्री-पुरुष सगळेच पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. पालखीच्या स्वागतासाठी तरुणांचा उत्साह वाखण्याजोगा होता. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शहरामध्ये गुरूवारी (दि. १९) सायंकाळी पावणे पाच आागमन झाले. भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, टाळ-मृदुगाचा गजर आणि वरुणराजाने केलेला पावासाचा शिडकावा यामुळे आनंदाला उधाण आले होते.
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती चौकामध्ये शहरवासीयांनी उत्साहात पालखीचे स्वागत केले. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी रथाचे सारथ्य केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, उपायुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, सचिन पवार, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे आदी उपस्थित होते.
टाळ मृदृंगाच्या गजराने उद्योगनगरी अक्षरश: दुमदुमली होती. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी शहरात दाखल होणार म्हणून भक्ती-शक्ती चौकामध्ये नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पावसाच्या संततधारेमध्ये देखील शहरवासियांनी पालखीच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. देहूतील इनामदार वाड्यातून सकाळी पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर अनगडबाबाशहा येथे पहिली अभंग आरती झाली. चिंचोली पादुका येथे दुसरी अभंग आरती झाली. देहूरोड येथील नागरिकांचे आदरातिथ्य घेऊन पालखी सायंकाळी पाच वाजून सात मिनिटाने निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकात दाखल झाली. याठिकाणी महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
सायंकाळी पालखीचे आगमन झाल्यावर अवघी उद्योगनगरी भक्तीरसात न्हाउन निघाली. गळ्यात तुळशी माळ, कपाळी गंध, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी व मुखी विठ्ठुनाम घेत वारीत सहभागी झालेल्या वारकर्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. तेवढ्याच उत्साहाने शहरातील नागरिकही वारीत सहभागी झाले.
आकुर्डीत पालखी विसावली
आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी विसावली. दिंड्यांचा मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खासगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुरेसे शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात आली. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बालवारकर्यांचा सहभाग
शहरातील विविध शाळांमधील बाल वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. वारकर्यांच्या वेषात टाळ, मृदृंग हातात घेऊन हे वारकरी वारीत सहभागी झाले. काहींनी विठ्ठल-रुखुमाईचा वेष परिधान केला होता.
विशेष सोयी-सुविधा
सुरक्षिततेच्या दृष्टीने शहराच्या प्रवेशद्वारापासूनच सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे बसविण्यात आले होते. वारकर्यांना राहण्यासाठी महापालिकेच्या व काही खासगी शाळांमध्ये वारकर्यांची राहण्याची सोय करण्यात आली.
वृक्षलागवडीचा संदेश
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती’ संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे झाडांचे रक्षण व्हावे म्हणून पालखी सोहळ्यामध्ये वृक्षलागवडीचा संदेश देण्यात आला. यासाठी ठिकठिकाणी स्वंयसेवी संघटनांनी फलक लावून जनजागृती केली.
वारकर्यांची मनोभावे सेवा
विविध संस्था व नागरिकांनी वैयक्तिकरित्या वारकर्यांची सेवा केली. चहा बिस्किट, चिवडा, पाण्याच्या बाटल्या, बुंदीचा प्रसाद यावेळी वारकर्यांना देण्यात आला. पालखीच्या मार्गावर ठिकठिकाणी वाहने लावून वारकर्यांना फळे देण्यात आली.
आरोग्य तपासणीसाठी विविध संघटनांचा पुढाकार
वारीमध्ये चालताना वारकर्यांना काही त्रास होऊ नये. तसेच कुणाला काही त्रास झाला तर उपचारासाठी शहरातील विविध संस्थानी वारकर्यांची मोफत तपासणी केली. विविध संस्थानी गोळ्या व औषधांचे वाटप केले. त्याचप्रमाणे मालिश तेल व बामही वारकर्यांना देण्यात आले.





