Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मुलगी राहा जन्मल्यानंतर आपल्या कामाच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल केल्याचं सांगितलं आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्ट केलं की आता ती एकावेळी एकाच चित्रपटावर लक्ष केंद्रित करायला प्राधान्य देते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा विवाह एप्रिल २०२२ मध्ये झाला होता. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये आलियाने मुलगी राहाला जन्म दिला. त्यानंतर तिच्या व्यावसायिक आयुष्यातही बदल झाले. आलियाच्या मते, आई झाल्यानंतर कामाची गती आणि प्रमाण दोन्ही बदलले आहेत. ती म्हणाली, “आता मला एक मुलगी आहे, त्यामुळे माझं काम करण्याचं वेळापत्रक वेगळं आहे. ही गती मला आरामदायक वाटते आणि मी यात आनंदी आहे. एकावेळी एकच चित्रपट करणे आणि त्यात पूर्ण ऊर्जा घालणे मला योग्य वाटते. पूर्वी मी एकाच वेळी दोन-तीन चित्रपट करत होते, पण आता तसं करायचं नाही.” ‘अल्फा’ या अॅक्शन चित्रपटाचं शूटिंग करताना मिळालेल्या अनुभवाबद्दल बोलताना आलिया म्हणाली की, बाळाच्या जन्मानंतर अॅक्शन सीन करणं तिच्यासाठी खूप खास होतं. यामुळे तिला स्वतःच्या शरीराची क्षमता समजली आणि शरीराचा अधिक सन्मान करायला शिकायला मिळालं. आलियाच्या आगामी दोन मोठ्या चित्रपटांमध्ये ‘अल्फा’ आणि ‘लव अॅन्ड वॉर’ यांचा समावेश आहे. ‘अल्फा’ हा वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील अॅक्शनपट असून त्यात शरवरी आणि बॉबी देओलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव अॅन्ड वॉर’ या चित्रपटात आलिया रणबीर कपूर आणि विक्की कौशलसोबत झळकणार असून हा चित्रपटही २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.