Ali Khamenei : आयातोल्लाह अली खामेनी यांनी फेटाळला अमेरिकेचा ‘तो’ प्रस्ताव

दुबई : अमेरिका आणि इराण दरम्यान सध्या सुरू असलेल्या इराणच्या अणू उर्जा प्रकल्पांना नियंत्रित करण्याबाबतच्या वाटाघाटींसंदर्भात अमेरिकेने मांडलेला प्राथमिक प्रस्ताव इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्लाह अली खामेनी यांनी फेटाळला आहे. त्यांनी या प्रस्तावावर टीका देखील केली. मात्र अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटी संपूर्णपणे फेटाळल्या नाहीत. अमेरिकेचा प्रस्ताव हा इराणच्या कल्पनेच्या १०० टक्के विरोधातील असल्याचे खामेनी यांनी म्हटले आहे. इराणच्या क्षमतेनुसार इराण अणूउर्जा निर्मिती करू शकण्याची जी घोषणा इराण सरकारने केली आहे, त्याच्या विरुद्ध अमेरिकेचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युरेनियम समृद्ध करण्याची क्षमता कायम ठेवणे ही इराणची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जर आमच्याकडे १०० अणुऊर्जा प्रकल्प असले आणि जर ते युरेनियमने समृद्ध नसतील तर ते आपल्यासाठी वापरण्यायोग्य नाहीत, असे खामेनी म्हणाले. जर आपल्याकडे युरेनियमचा साठा समृद्ध नसेल तर आपल्याला अमेरिकेकडे भीक मागावी लागेल, असेही ते म्हणाले. इराणला अमेरिकेकडे युरेनियमची भीक मागायला लागेल, असे जरी खामेनी यांना वाटत असले, तरी काही अण्वस्त्रधारक देशांना बाहेरील पुरवठादारांकडून युरेनियम मिळत असते. मात्र खामेनी यांनी त्याचा उल्लेख केला नाही. इराण आणि अमेरिकेत झालेल्या पाच फेऱ्यांच्या चर्चेनंतरही अमेरिकेच्या प्रस्तावाचे तपशील अजूनही स्पष्ट झालेले नाहीत.
अमेरिकेने इराणसमोर मांडलेल्या प्रस्तावाचा काही तपशील काही माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार इराणकडे समृद्ध स्थितीत उपलब्ध असलेल्या युरेनियमच्या साठ्याचा तपशील अमेरिकेला मिळाला आहे. हे युरेनियम इराण आणि आजूबाजूच्या देशांमध्ये साठवून ठेवण्यात आले आहे. मात्र इराण आपला संपूर्ण अणू कार्यक्रम पुर्णपणे सोडून देण्यास तयार आहे का नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. अमेरिकेच्या प्रस्तावानुसार इराणला ३ टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्ध करणेच शक्य असणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी स्टीव्ह विटकॉफ यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार इराणवरील काही आर्थिक निर्बंध हटवले जावेत आणि त्याबदल्यात इराणने आपल्या अणू कार्यक्रमाला नियंत्रित करावे अथवा हा कार्यक्रम पुर्णपणे थांबवावा, असे सुचवण्यात आले आहे. परंतु जर करार न झाल्यास गाझा पट्टीतील इस्रायल-हमास युद्धावरून मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढू शकतो.
आर्थिक निर्बंधांमुळे अडचणीत आलेली इराणची अर्थव्यवस्था कधीही कोसळू शकते. देशात असंतोषही निर्माण होऊ शकतो. अमेरिकेकडून इराणच्या अणू प्रकल्पांवर थेट हवाई हल्ले देखील केले जाऊ शकतात. याशिवाय इराणकडून संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांना दिले जाणारे सर्व सहकार्य संपुष्टात आणले जाऊ शकते. तसे झाल्यास इराणही आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. इस्रायलने तर पहिल्यापासूनच इराणच्या अणू प्रकल्पांना उद्ध्वस्त करण्याची मागणी लावून धरली आहे.





