लंडन – आयर्लंडमध्ये रहात असलेल्या भारतीय नागरिकांसाठी तेथील दूतावासाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. राजधानी डब्लिन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये भारतीय नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात भारतीयांवरच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्यासंदर्भात भारतीय प्रशासनाकडून आयर्लंडच्या प्रशासनाशी संपर्क साधला गेला असून भारतीयांवरील हल्ले थांबवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली जाते आहे. भारतीय नागरिकांनीही सतर्कता बाळगावी आणि निर्जन ठिकाणी एकट्याने जाणे टाळावे, असे भारतीय दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. भारतीय दूतावासाने भारतीयांच्या मदतीसाठी ०८९९४२३७३४ हा संपर्क क्रमांक आणि cons.dublin@mea.gov.in. हा ईमेल आयडी देखील प्रसिद्ध केला आहे. दिनांक १९ जुलै रोजी डब्लिनच्या टॅलाघ्ट उपनगरातील पार्कहिल रोड येथे ४० वर्षीय भारतीय व्यक्तीवर क्रूर हल्ला झाला होता. हा हल्ला निर्दयी, वर्णद्वेषी हिंसाचार असल्याचे स्थानिकांनी म्हटले होते. त्यानंतर हा स्थानिक भारतीयांना हा सल्ला देण्यात आला आहे. वर्णद्वेषी आणि हिंसक घटनांविरोधात स्टॅन्ड अगेन्स्ट रेसिझम नावाने निदर्शन आंदोलन देखील आयोजित करण्यात आले होते.