केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना अलर्ट, गर्दीच्या ठिकाणी ‘मास्क’ आवश्यक

नवी दिल्ली – करोना महामारीनंतर आता एच-3एन-2 विषाणूने दहशत वाढवली आहे. व्हायरल तापाने देशाला जणू ग्रासले आहे. एच-3एन-2 इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे देशात मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यापासून देशात एडेनोव्हायरसचे रुग्णही नोंदवले जात आहेत. दरम्यान अनेक राज्यांमध्ये कोविड-19 संसर्गामध्येही वाढ दिसून आली आहे, अशा परिस्थितीत आता केंद्राने सर्वच राज्यांना अलर्ट दिला आहे.
यासंदर्भात नीती आयोगानेही आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य सचिवांच्या वतीने सर्व राज्यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून आयसीएमआरने हा विषाणू एच-3एन-2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे.
सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही एच-3एन-2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासनही देण्यात आले आहे. दरम्यान, या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.





