अल्बर्ट आइनस्टाईन यांची सही असलेल्या पत्राचा 32 कोटी रुपयांना लिलाव, जाणून घ्या काय आहे खास

वॉशिंग्टन – महान भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचे स्वाक्षरी असलेले पत्र एका लिलावात 32 कोटी रुपयांना विकले गेले आहे. आईन्स्टाईन यांनी हे पत्र १९३९ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांना पाठवले होते. या पत्रात आइन्स्टाईन यांनी अण्वस्त्रांच्या विकासाबाबत इशारा दिला होता. न्यूयॉर्कमधील फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांच्या लायब्ररीत हे पत्र सापडले होते.
पत्रात अणुबॉम्बबाबत इशारा –
या पत्रात अल्बर्ट आइनस्टाइन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना जर्मनी अण्वस्त्रे विकसित करत असल्याचा इशारा दिला होता. पत्रात आइनस्टाइन यांनी म्हटले आहे की, ‘अलीकडेच अणुभौतिकशास्त्रात जे काम झाले आहे, त्यामुळे युरेनियमचे नवीन आणि महत्त्वाच्या उर्जा स्त्रोतामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे.’ आईन्स्टाईन यांनी चेतावणी दिली की ‘ही ऊर्जा खूप शक्तिशाली स्फोटके बनवण्यासाठी वापरली जाऊ शकते. याच पत्रात आइनस्टाइन यांनी अमेरिकन सरकारला न्यूक्लियर फ्युजनवर संशोधन करून अणुबॉम्ब बनवण्याचा सल्लाही दिला होता.
जगातील सर्वात प्रभावशाली पत्र-
आइनस्टाईनच्या पत्राचा लिलाव करणाऱ्या क्रिस्टीज या कंपनीशी संबंधित ज्येष्ठ तज्ज्ञ पीटर क्लार्नेट यांनी या पत्राला ‘जगाच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली पत्रांपैकी एक’ म्हटले आहे. आईन्स्टाईनने हे पत्र १९३९ च्या उन्हाळ्यात लिहिले होते. 2002 मध्ये, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक पॉल ॲलन यांनी 21 लाख डाॅलरला एक संग्रह विकत घेतला होता. आईन्स्टाईनचे हे पत्रही याच संग्रहाचा भाग होते. यापूर्वी हे पत्र माल्कम फोर्ब्स या प्रकाशकाकडे होते, माल्कम फोर्ब्सने हंगेरियन भौतिकशास्त्रज्ञ लिओ झिलार्ड यांच्याकडून विकत घेतला होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिलार्ड यांनीच हे पत्र लिहिले होते, ज्यावर अल्बर्ट आइनस्टाइन यांची सही होती. मात्र, जर्मनीने शरणागती पत्करली तेव्हा अण्वस्त्रांचा वापर योग्य नसल्याचे आईन्स्टाईन यांच्या लक्षात आले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमावर अण्वस्त्रांचा वापर केला, ज्यात दोन लाखांहून अधिक लोक मारले गेले. आईन्स्टाईन यांनी याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते.


