प्रभात वृत्तसेवा आळंदी – नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांतीचा उत्सव अलंकापुरी नगरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो महिला भाविक मंगळवारी (दि. 13) अलंकापुरीत मुक्कामी दाखल झाल्या आहेत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अलंकापुरीत विविध पूजासाहित्य, ओवशाचे साहित्य, हळदी-कुंकू, वाण आदींची दुकाने थाटण्यात आली असून संपूर्ण इंद्रायणी घाट महिला भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. आज पहाटेपासूनच राज्याच्या विविध भागांतून महिला भाविक मिळेल त्या वाहनाने अलंकापुरीत दाखल होत आहेत. या दिवशी माऊलींना ओवसण्यासाठी महिला भाविकांसाठी माऊली मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पुरुष भाविकांना माऊलींच्या मुखवट्याचे स्पर्शदर्शन करून हनुमान दरवाज्याने बाहेर सोडले जाते, तसेच या दिवशी पुरुषांना मंदिर परिसरात फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नवरीसारखी नटलेली, सजलेली सुवासिनी भगिनी मोठ्या संख्येने हातात ओवशाचे ताट घेऊन, त्यातील पूजासाहित्य, हळदी-कुंकू व वाणाची देवाणघेवाण करीत आनंदोत्सवात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण अलंकापुरी भक्तिमय व उत्सवमय वातावरणाने भारावून गेली आहे. यंदा माऊली देवस्थानतर्फे येणार्या सर्व सुवासिनींसाठी इंद्रायणी नदीच्या तीरावर विशेष ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानच्या प्रथम महिला विश्वस्त अॅड. रोहिणीताई पवार यांनी दिली. यानंतर इंद्रायणीची महाआरती होणार असून भाविकांना या पावन सोहळ्याचा लाभ घेता येणार आहे.