आळंदी : कैलासासा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचें वैकुंठ पुरातन ॥१॥ भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी । पंच कोशावरी पुण्यभूमी ॥२॥ सुखाची हे मूर्ति नीलकंठलिंग । चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे ॥३॥ परमार्थ सुअर्थ देखतांची संत । सांगितली मात अनुभवाची ॥४॥ नामा म्हणे देवा हें स्थळ चांगलें । चित्त मन रंगलें ज्ञानोबाचें ॥५॥ श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारीसाठी आता आळंदी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यभरातून वारकरी दिंड्या हातात भगव्या पताका, गळ्यात टाळ, विणा, डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आळंदीत पोहोचणाऱ्या सर्वच रस्त्यावरून हरिनामाचा गजर करत येत असताना दिसत आहेत. बुधवार (दि. 12) पासून सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे बहुतांश परंपरेच्या वारकरी दिंड्या आज रात्रीपर्यंत आळंदीत पोहोचतील आणि उद्यापासून ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहांना सुरुवात होईल. आळंदी पंचक्रोशीत वारकरी आपल्या मुक्कामी पोहोचत आहेत. सर्व धर्मशाळा आत वारकऱ्यांनी गजबजू लागल्या आहेत. तर ज्या वारकऱ्यांची धर्मशाळांत सोय नाही अशांनी नियोजित ठिकाणी राहुट्या ठोकून आपली मुक्कामाची व्यवस्था केली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. वारी काळात अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. मंगळवार (दि. 11) येथील फ्रुटवाले धर्मशाळामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बदोबस्तासाठी तैनात सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचे ब्रिफिंग घेण्यात आले. आळंदी नगरपरिषदेच्या मार्फत वारी काळात 24 तास पाणीपुरवठा आणि वीज मंडळाकडून 24 तास वीज पुरवठा केला जाणार आहे. वीज, पाणी, आरोग्य विभागाच्या सुविधांसाठी नगरपरिषदेमध्ये मध्यवर्ती नागरिक केंद्र उभारले आहे. चोरी किंवा अन्य तक्रारी घेण्यासाठी आळंदी पोलिसांत मध्यवर्ती तक्रार निवारण केंद्र उभारले आहे. भाविकांना सूचना देण्यासाठी शहरात ठिकाठिकाणी ध्वनिक्षेपक लावले आहेत.शनिवारी (दि.15) रोजी कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा), तर सोमवारी (दि.17) रोजी माऊलींचा 729 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे. इंद्रायणीत विसर्ग सोहळ्यासाठी इंद्रायणी नदीमध्ये आंध्रा धरणातून 100 क्युसेक आणि जाधववाडी लघुपाटबंधारे धरणाथून 50 क्युसेक असा एकूण दीडशे क्युसेक पाणीपुरवठा सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे कार्तिकी वारी दरम्यान इंद्रायणीमध्ये तीर्थ स्नानाची चांगली सोय होईल अशी अपेक्षा आहे. हैबतबाबा पायरी पूजनाने सोहळ्याची सुरुवात बुधवार (दि.12) सकाळी 7 ते 9 यावेळेत हभप. बाळासाहेब नि. पवार, हैबतबाबा वंशज प्रतिनिधी यांच्यातर्फे वै. गु. हैबतबाबांच्या पायरीची पूजा होऊन माऊलींच्या समाधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडे सहा ते आठ या वेळेत ह.भ.प. योगीराज महाराज ठाकूर यांच्यातर्फे वीणा मंडपात कीर्तन सेवा पार पडणार आहे. भाविकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास ज्या रस्त्यावरून बहुंताश वारकरी आळंदीला येतात, तो पुणे- आळंदी रस्ता खड्ड्यांनी ग्रासलेला आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली असताना देखील अद्यापही खड्डे बुजवले नाहीत. दरवर्षी आठवडाभर आधी रस्त्यांची डागडुजी करण्यात येते. मात्र, यंदा उशीर झाला आहे. याबाबत नगरपरिषदेशी संपर्क साधला असता रात्री सर्व खड्डे बुजविले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. भजनी साहित्यांची दुकाने गजबजली वारी काळात संपूर्ण आळंदी ठिकठिकाणी हरिनाम सप्ताहांचे आयोजन केले जाते. सप्ताहांमध्ये वाजवले जाणारे वाद्य साहित्यांची, टाळ, पखवाज, वीणा आदी साहित्यांची दुकाने गजबजली आहेत. नवीन वाद्य खरेदीसह जुन्या वाद्यांच्या दुरूस्तीची कामेही जोमात सुरु असल्याचे दिसत आहे. वारीला आलेले अनेक भाविक गावी पततताना आपल्या गावातील भजनी मंडळासाठी येथून वाद्यांची खरेदी करीत असतात. आळंदी पोलिसांत पाससाठी लगबग (दि.12) पासून आळंदीत वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक आणि वाहरकरी दिंडींच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. आळंदीतील अत्यावश्यक कामांच्या आणि दिंडीच्या वाहनांसाठी आळंदी पोलीस ठाण्यात पासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहन पाससाठी आज पोलीस ठाण्यात ग्रामस्थ, भाविकांची लगबग दिसून आली. “वारकऱ्यांना वारीकाळात आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. पाणी, आरोग्य, वीज, स्वच्छता यासंदर्भात कोणतीही समस्या उद्भवल्यास वारकरी भाविकांनी नगरपरिषदेच्या नियंत्रण केंद्रात संपर्क साधावा. पुणे – आळंदी रस्त्यावरील देहू फाटा परिसरातील तसेच सर्व आवश्यक ठिकाणचे खड्डे रात्री बुजवण्यात येतील. -माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद.