विजेच्या लपंडावामुळे आळंदीकर त्रस्त ; नागरिकांचे महावितरणला निवेदन

आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देखभाल दुरुस्तीसाठी दर शुक्रवारी विद्युत पुरवठा खंडित करून महावितरण विभागाकडून आवश्यक कामे केली जातात. मात्र इतर दिवशीही गेली महिनाभरापासून वारंवार विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे आळंदीकर नागरिक त्रस्त आहेत. वीज पुरवठा सुरळीत सुरु राहावा, यासाठी आळंदीकर नागरिक तसेच आळंदी विकास युवा मंचच्या वतीने आळंदी महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले.
महावितरणचे तालुका वरिष्ठ अधिकारी, आळंदी महावितरणचे सहायक अभियंता पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी रवींद्र रणदिवे , किरण नरके , संदीप पगडे , मुकुंद प्रसादे , स्वप्नील कारेकर, ज्ञानेश्वर गुळुंजकर, संदीप नाईकरे , वासुदेव लेंडघर यांसह विकास मंचचे सदस्य उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे की, वारीनिमित्त दर शुक्रवारी संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित केला जातो, तरीही इतर दिवशी देखील वारंवार विदयुत पुरवठा (पाऊस नसताना) खंडित होणे चुकीचे आहे.मुसळधार पाऊस तसेच वादळामुळे तांत्रिक बिघाड होणे स्वाभाविक आहे, परंतु आपण आपले मनुष्याबळ व सामुग्री वाढवावी त्याबरोबर पाऊस काळात काम करत असताना आपल्या सर्वांच्या सुरक्षितता आम्हाला देखील महत्वाची आहे. तरी वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा, विद्युत पुरवठा सुरळीत राहावा.





