प्रभात वृत्तसेवा आळंदी – इंद्रायणी नदीवरील चऱ्होली खुर्द व चऱ्होली बुद्रुक यांना जोडणारा पूल रहदारीस सुरक्षित व सक्षम करण्यासोबत त्याच्या बेअरिंग क्षमतेत वाढ करून देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दरम्यान हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी येथे नियोजनपूर्व समन्वय बैठक घेण्यात आली. बैठकीत आळंदी पंचक्रोशीतील नागरिक, लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलीस पाटील, वाहतूक पोलीस अधिकारी तसेच औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत वाहतूक व्यवस्थेबाबत जनजागृती व पर्यायी मार्गांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपायुक्त मारुती जगताप होते. या बैठकीत पुलाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दर्शनासाठी येणारे भाविक, वारकरी, लग्न समारंभांची वाहने, औद्योगिक भागातील कामगार बसेस तसेच अवजड मालवाहतूक यांचा विचार करून पुढील काळात रहदारी सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. पुलाचे काम प्रभावी व जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आळंदी-मरकळ रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आळंदी शहरात अवजड वाहनांना प्रवेश न देता पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश पोलीस उपायुक्त जगताप यांनी दिले. यासाठी स्थानिक नागरिक, संस्था, पदाधिकारी व वाहतूक पोलीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी विविध सूचना मांडल्या. रस्ते खड्डेमुक्त करणे, भाविक व वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, प्रदक्षिणा मार्गावर वाहनतळ टाळणे, दिशा दर्शक फलक उभारणे, नगरप्रदक्षिणा मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक राबविणे, तसेच आळंदीतील अर्धवट रस्ते व पुलांची कामे लवकर पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. “सध्या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास पुणे महानगर नियोजन विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) होणे आवश्यक आहे. आळंदी बाह्यवळण मार्ग ४५ मीटर रुंदीकरणानुसार विकसित करण्याची मागणी चऱ्होली ग्रामस्थांनी केली आहे.” – अजय पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग