Alandi Theft Crime : लक्ष्मीनगरात आठवड्यात चार वेळा घरफोडी ; परिसरात भीतीचे वातावरण

आळंदी – आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे (विश्रांतवडाच्या शेजारी, चऱ्होली खुर्द ) आज मंगळवार (दि. 1 ऑक्टोबर) पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास दोन ठिकाणी घरफोडी झाली. यात एका घटनेत चांदीचे दागिने (10 तोळे पैंजण, लहान बाळाचे कडे), रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. तर बाजूलाच दुसऱ्या घरात घरमालक नसल्याने नेमकी काय चोरी झाली हे समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पाहणी केली. पुढील कारवाई आळंदी पोलीस करत आहेत.
दरम्यान परिसरात एका आठवड्यात चार वेळा चोरी, घरफोडीची घटना घडली आहे. यापूर्वी देखील इतर घरफोडीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरट्यानी लंपास केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरटा सीसीटीव्हीत कैद –
पहाटे घडलेल्या चोरीच्या घटनेतील चोर शेजारच्या घरावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अंदाजे 20 ते 25 वर्ष वयाचा तरुण येताना आणि जाताना दिसत आहे.
बंद घर चोरट्याचे टार्गेट –
दोन्ही घटनेत घर बंद होते. लॉक तोडून चोरी करण्यात आली. यापूर्वीही घरात कोणी नसताना लॉक तोडून चोरी करण्यात आली होती. बंद असलेले घर चोरटे टार्गेट करत असल्याचे या घटनामधून दिसून येत आहे.
पोलीस गस्त वाढविण्याची मागणी –
लक्ष्मीनगर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चारही घटनेत रात्री 3 ते साडेतीन वाजताच्या सुमारास चोरी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी रात्री परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.






