आळंदी पोलिसांची दमदार कारवाई: सराईत एटीएम बॅटरी चोर जेरबंद, 4 लाखांच्या 24 बॅटऱ्या जप्त

आळंदी – आळंदी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांविरुद्ध मोठी कारवाई करत सराईत चोर दत्तात्रय विठ्ठल भोसले (वय ४४, रा. दिघी, मूळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ४ लाख रुपये किंमतीच्या २४ रिचार्जेबल एटीएम बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईने आळंदी, चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आळंदी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याअंतर्गत चोरी गेलेल्या बॅटऱ्यांचा शोध घेताना तपास पथकाने चिंबळी, मोशी आणि दिघी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. १२ एप्रिल रोजी पोलीस हवालदार वहिल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चिंबळी फाटा येथे बर्गेवस्तीतील हिताची एटीएममधील बॅटरी चोरी करणारा संशयित बॅटरी विकण्यासाठी आला आहे. तपास पथकाने तातडीने चिंबळी फाटा येथे सापळा रचून दत्तात्रय भोसले याला ताब्यात घेतले.
प्रथम उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भोसले याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने ६ एप्रिल रोजी बर्गेवस्ती येथील हिताची एटीएममधून ३ बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याच्याकडून आळंदी, चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २४ बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये आळंदी येथील ३ बॅटऱ्या (किंमत ५०,००० रुपये), चाकण येथील ३ बॅटऱ्या (किंमत ५०,००० रुपये) आणि महाळुंगे येथील १८ बॅटऱ्या (किंमत ३,००,००० रुपये) यांचा समावेश आहे. या कारवाईने तीन पोलीस स्टेशनांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस हवालदार लोणकर, वहिल, होले, नरवडे, दहिफळे, खेडकर, डुमनर, सूर्यवंशी, डिकले आणि सातपुते यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार लोणकर करत आहेत.
आळंदी पोलिसांची दमदार कारवाई: सराईत एटीएम बॅटरी चोर जेरबंद, 4 लाखांच्या 24 बॅटऱ्या जप्त pic.twitter.com/30SOgywqXd
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) April 14, 2025





