किरकोळ चूकही पडतेय महागात ः अवैध वाहतूक, पार्किंगकडे मात्र सपशेल दुर्लक्ष
आळंदी -आळंदी शहरात पोलिसांनी ऑनलाइन कारवाई करण्यावर भर दिला आहे. ऑनलाइन कारवाईच्या नादात किरकोळ चुकही वाहनचालकांना महागात पडत असून यातून वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
तीर्थक्षेत्र आळंदी येथे संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर, नगरपरिषद चौक, मरकळ रोड, चाकण चौक, देहू फाटा, वाय जंक्शन, भैरोबा चौक, वडगाव रस्ता आदी ठिकाणी काही कामानिमित्त थ्री व्हीलर व चारचाकी छोटी वाहने तसेच मोठी वाहने उभी केली असता पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी जी जी वाहने रस्त्याच्या कडेला उभी दिसतील अशा वाहनांचे फोटो काढून ऑनलाइन फोटो पुढे फॉरवर्ड करतात. गेली दोन महिन्यांपासून ही मोहीम सुरू असून वाहन चालक यांच्या या ऑनलाइन फाइनला वैतागले आहेत. अनेकांना त्रासदायक ठरणारा वाहतूक पोलिसांचा हा “धंदा’ बंद करावा अशी मागणी सर्व वाहन चालक करीत आहेत.
कोणी काही कामानिमित्त आपली गाडी अगदी थोड्या वेळासाठी उभी करून जातात; मात्र त्याचा गैरफायदा वाहतूक पोलीस घेऊन लगेच फोटो काढून फाइन मारतात. वाहतूक सुरूळीत जरुर करा; मात्र विनाकारण कोणत्याही वाहनचालकास बळीचा बकरा बनवू नका. तसेच आळंदी शहरात संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग ठिकाणचे चौक इत्यादी ठिकाणी वाहतूक विभागाचा “नो पार्किंग झोन’ आता असा एकही फलक दिसत नाही. नो पार्किंगचे फलक असावेत, सम-विषम तारखांना वाहने उभी करण्याची सुविधा असावी तसेच आळंदी बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस यांना खासगी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा अडथळा निर्माण होतो आहे, तोदेखील दूर करावा अशी मागणी आळंदी बसस्थानकातून केली जात आहे.
वाहनचालक म्हणतात
तुम्ही ऑनलाइन फाइन जरूर मारा; परंतु संबंधित वाहन चालक कोणत्या कामानिमित्त थांबलेला आहे? त्याने विनाकारणच आपले वाहन रस्त्यात उभे केले का? त्याने अल्प वेळासाठी उभ्या केलेल्या गाडीमुळे वाहतुकीस खरोखरच अडथळा झालाय का? या सर्व प्रश्नांची शहानिशा करा. तसेच वाहनचालक जोपर्यंत गाडी जवळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाइन फाइन मारण्याचा अधिकार नाही, असे वाहनचालकांमध्ये बोलत आहेत.