प्रभात वृत्तसेवा आळंदी – मकरसंक्रांत आणि षट्तिला एकादशीच्या दुग्धशर्करा योगावर आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. पहाटेपासूनच भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. एकादशीनिमित्त मंदिरात आणि महाद्वारात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात वारकऱ्यांच्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावर मार्गस्थ होत होत्या. अनेक भाविकांनी अजानवृक्ष आणि सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरात ज्ञानेश्वरी पारायण करण्यासाठी उपस्थिती लावली.नवीन वर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला भाविकांनी माऊलींना ओवसा अर्पण केला. मंदिरात महिला वर्ग एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाणाची देवाण-घेवाण करत सणाच्या शुभेच्छा देताना दिसत होता. बाजारातही तिळगुळ, सुगडे पूजन आणि वाणाच्या साहित्याची जोरदार विक्री झाली. इंद्रायणी घाटावर आणि मंदिर परिसरात भाविकांसाठी उपवासाच्या पदार्थांचे वाटपही करण्यात आले. इंद्रायणी घाट परिसर विविध दुकानांनी आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.सायंकाळी मकरसंक्रांती व एकादशीनिमित्त इंद्रायणी घाटावर देवस्थानच्या वतीने हळदी-कुंकू आणि इंद्रायणी आरतीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या उत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आळंदी पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसर आणि इंद्रायणी घाट परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.