प्रभात वृत्तसेवा आळंदी – श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने विठ्ठल महाराज वासकर यांच्या नियंत्रणाखाली पंढरपूर ते आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील वारीच्या परतीच्या प्रवासात श्रीपांडुरंगरायांचा पालखी सोहळा आज (दि. २०) रोजी श्रीज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर, वडमुखवाडी येथे मुक्कामी विसावणार आहे. ही माहिती देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली. श्रीपांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्याचे या ठिकाणी विसावण्याचे हे १६ वे वर्ष असून, येथे अखंड सेवा रुजू होत आहे. मुक्कामात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सायंकाळी सातच्या सुमारास श्रींच्या पालखी सोहळ्याचे आगमन व स्वागत हरिनामाच्या गजरात होणार आहे. श्रींच्या पादुकांची पूजा व आरती होणार आहे. तसेच सोहळ्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार, भाविकांना श्रींचे पादुका दर्शन आणि महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. या विसाव्यात मुक्कामी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तापकीर यांनी केले आहे.