प्रभात वृत्तसेवा आळंदी – गणपती बाप्पा मोरया! या गजराने अवघा महाराष्ट्र काही दिवसांत भक्तिमय झालेला दिसणार आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने चैतन्याची लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. अशा काळात, पुण्याच्या चर्होली बुद्रुक गावात एका कुंभार घराण्याचा इतिहास मूर्त स्वरूपात उभा राहतो – भानुदास कुंभार यांचे घराणे, जे तीन पिढ्यांपासून गणेशमूर्ती घडवत आहे.चर्होलीत भानुदास कुंभार यांनी सुरू केलेली मूर्तीनिर्मिती आजही ते स्वतः आणि त्यांचा मुलगा योगेश कुंभार जोमाने पुढे नेत आहेत. गणेशोत्सव हा आता राज्योत्सव म्हणून साजरा केला जात असल्याने यंदा मूर्ती मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, यावर्षी न्यायालयाच्या उशिरा घेतलेल्या निर्णयामुळे पीओपी मूर्तींच्या निर्मितीला फटका बसला असून संपूर्ण उद्योगावर त्याचा परिणाम झालेला आहे.शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती पेण वरून आणली जाते, तर पीओपीसाठी लागणारा कच्चा माल राजस्थानहून येतो. या सर्व प्रक्रियेला वेळ, मेहनत आणि अनुभव आवश्यक असतो. मूर्ती साच्यातून काढल्यानंतर हात, सोंड लावणे, रंगकाम, बॉडी शेडिंग, डोळ्यांची रेखाचित्रे, उपरणं, पितांबर, पाट व दागिन्यांचे सोनेरी काम – ही प्रत्येक पायरी मेहनतीची आणि कौशल्याची असते. विशेषतः डोळ्यांचे काम केवळ अनुभवी कारागिरांनाच शक्य होते. रंग व इतर साहित्य महाग झाल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. परिणामी, एक गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांना 10 ते 20 दिवस लागतात. कमी वेळेत अधिक उत्पादन करणे कठीण झाले आहे. “यंदा कोर्टाच्या निर्बंधांमुळे पीओपी मूर्ती उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे मजुरी वाढली आणि मूर्तींची संख्या कमी राहिली. परिणामी मूर्ती महाग झाल्या आहेत.” -योगेश कुंभार “शाडू मातीच्या मूर्ती सुकायला आणि रंगवायला वेळ लागतो. त्यामुळे त्या थोड्या महाग असतात. मात्र भक्तांची विशेष मागणी असल्याने त्या बनवतो.” -भानुदास कुंभार