आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या कर विभागाकडून चालू आर्थिक वर्षात एकूण मागणीच्या ४०.४१ टक्के म्हणजे चार कोटी चाळीस लाख रुपये मिळकत कर वसुली झाली आहे. उर्वरित साठ टक्के कर वसुलीसाठी अवघे तीन महिने शिल्लक आहेत. थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी राबवलेल्या अभय योजनेत ५३ मिळकतधारकांची व्याजाची रक्कम वगळून कर वसुली करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे चालू आर्थिक वर्षातील मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट अकरा कोटींचे आहे. यामध्ये मागील थकबाकी पाच कोटी ३३ लाख, तर चालू मागणीची रक्कम पाच कोटी ६८ लाख आहे. थकबाकीपैकी एक कोटी ९७ लाख रुपयांची वसुली झाली असून, चालू मागणीपैकी दोन कोटी ४८ लाख रुपयांची वसुली झाली आहे. नगरपरिषद आता मतमोजणीनंतर करवसुलीसाठी तीव्र स्वरूपात पाठपुरावा करेल. ज्या मिळकत धारकांनी कर थकीत ठेवला आणि शास्ती कर तसेच व्याज माफीसाठी अर्ज केला, त्यांना जिल्हाधिकारी स्तरावर प्रकरण पाठवून ५० टक्क्यांपर्यंत व्याज माफी केली जाईल. मात्र, मूळ कर भरावाच लागेल. तसेच, ज्यांनी १०० टक्के शास्ती कर माफीसाठी अर्ज केला, त्यांची प्रकरणे राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहेत. – माधव खांडेकर, मुख्याधिकारी अभय योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवले होते. ५३ अर्ज मंजूर झाले आणि त्यांना करावरील व्याज माफ करून मिळकत कर भरून घेण्यात आला. – सीमा चारभे, कर विभागप्रमुख आकडेवारी (दि. ९ पर्यंत) एकूण मिळकती – ८८९३ एकूण अधिकृत नळ जोड – ३५०० सप्टेंबर महिन्यातील करवसुली – २२ टक्के १७ नोव्हेंबरपर्यंत कर वसुली – ४.०७ कोटी आजपर्यंतची एकूण वसुली – ४०.४१%