Alandi Kartiki Yatra 2024: आळंदी कार्तिकी वारीच्या अनुषंगाने समन्वय बैठक

आळंदी – सर्व वारकरी भाविक भक्तांना आता आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची ओढ लागली आहे. दरवर्षी लाखो वारकरी भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत असतात. यावर्षी येत्या 23 नोव्हेंबरपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरु होत आहे.
26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी तर 28 नोव्हेंबरला माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान साजरा होणाऱ्या या सोहळ्याच्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशन येथे आज शुक्रवारी (दि. 22) रोजी समन्वय बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीदरम्यान वाहतुक व्यवस्था, पार्किंग, गर्दीचे नियोजन, मनुष्यबळाचा योग्य वापर तसेच गुन्हेगारी नियंत्रणा करीता आवश्यक उपाययोजना बाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -३ डॉ. शिवाजी पवार, सहा. आयुक्त (चाकण विभाग) राजेंद्रसिंग गौर, सहा. आयुक्त (पिंपरी विभाग) सचिन हिरे, वपोनि आळंदी पो.स्टे. भिमराव नरके, वपोनि दिघी पो.स्टे. बापु ढेरे, तसेच श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, यांसह अधिकारी उपस्थित होते.






