आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथामागे 2 आणि 3 क्रमांकाच्या ‘श्री टेंभूकर दिंडी’चा इतिहास आणि परंपरा

आळंदी (ज्ञानेश्वर फड) – नलगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।। देवाच्या प्राप्तीकरिता आपल्याला कोठेही जाण्याची गरज नाही, असे तुकोबारायांनी सांगितले. आपली भक्ती एवढी वाढवावी की, भगवंत संत सावतांप्रमाणे आपल्या घरी भेटायला येईल. हे काही फार अवघड नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, देवाचे नामचिंतन सोपे आहे, असा धडा टेंभूकर दिंडीचे मालक ह.भ.प. श्रीकांत महाराज टेंभूकर यांनी घालून दिला.
टेंभूकर महाराज यांच्याशी ‘वारी आणि दिंडी’ या विषयावर दै. प्रभातने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, करोनाच्या संकटामुळे शासनाने वारीवर निर्बंध घातले आहेत. शासनाचे जसे नियम आहेत तसे वारीचे पण काही नियम आहेत. पण, ही परंपरा खंडीत होत आहे, याचे दु:ख तर साहजिक आहे. शासनाने किमान 100 वारकऱ्यांना तरी पायी वारीसाठी परवानगी द्यायला हवी होती. मात्र, शासनाने निर्बंध घातलेच आहेत तर वारकऱ्यांनी यंदाची वारी घरातूनच अधिकाधिक वेळ भगवत चिंतनात घालवून करावी, त्याचे पुण्यही तेवढेच थोर आहे.
टेंभूकर दिंडीचा इतिहास आणि परंपरा –
टेंभूकर दिंडी ही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या रथामागे 2 आणि 3 क्रमांकाची मानाची दिंडी आहे. श्री गुरू हैबतबाबा यांनी 1832 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरु केला. त्यावेळी हैबतबाबा यांनी भिवाजी महाराज यांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास सांगितले. सुरुवातीला समाज कमी असल्याने भिवाजी महाराज हे पालखीच्या दांडीला धरून चालत असत. कालांतराने समाज वाढत गेला आणि टेंभूकर दिंडीला 2 क्रमांक मिळाला. भिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे बंधू कृष्णा महाराज टेंभूकर यांनी परंपरा पुढे सुरु ठेवली. काही दिवसांनी या दिंडीच्या दोन दिंडी झाल्या. त्यांना 2 आणि 3 क्रमांक मिळाला. सध्या दिंडी क्र.2 चे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज टेंभूकर, सोपान महाराज टेंभूकर तर 3 क्रमांक दिंडीचे प्रमुख निवृत्ती महाराज टेंभूकर आहेत. पालखी सोहळ्यात समाज आरती वेळेस परंपरेनुसार टेंभूकर दिंडीचे विणेकरी असल्याशिवाय आरती होत नाही, तसेच आरतीनंतर कीर्तनात चाली म्हणण्याचा हा विशेष मान टेंभूकर दिंडीला मिळालेला आहे. या दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांसाठी जेवण बनवले जात नाही तर ज्ञानेश्वर महाराज यांच्यासाठी जो नैवेद्य येतो तो टेंभूकर दिंडीतील वारकऱ्यांना देण्याची परंपरा आहे. या घराण्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूर येथील टेंभूकर मठात 1832 च्या आधीपासून अखंड वीणा पहारा सुरू आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
पायी वारी असती तर… आजचा मुक्काम – जेजुरी





