प्रभात वृत्तसेवा आळंदी – येऊ घातलेल्या आळंदी नगरपरिषद निवडणुकीत आता हभप महाराजही मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आधीच चुरशीच्या बनलेल्या निवडणुकीला धार्मिक रंग चढण्याची चिन्हे दिसत आहेत.शहरातील वारकरी परंपरेशी घट्ट नातं असलेल्या या हभप महाराजांनी समाजकारणातून लोकसेवा केली असून, गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी शहरातील नागरिकांशी जवळीक निर्माण केली आहे. त्यामुळे जर त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली, तर पारंपरिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर नव्या समीकरणांची उभारणी होऊ शकते. विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील प्रसिद्धी किर्तनकार महाराज स्वतः किंवा त्यांची धर्मपत्नी नगरपरिषद निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. काही राजकीय पक्षाशी त्यांचु प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून, येथे धार्मिक आस्था आणि राजकारणाचा संगम नेहमीच पाहायला मिळतो. त्यामुळे एखाद्या वारकरी हभप नेत्याची निवडणूक लढविण्याची शक्यता निर्माण झाल्याने शहराच्या राजकीय वातावरणात उत्सुकता आणि चुरस निर्माण झाली आहे. स्थानिक राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, जर महाराज रिंगणात उतरले, तर पारंपरिक मतदारसंघात बदल होऊन निवडणुकीचे गणित पूर्णपणे बदलू शकते. आता महाराज खरोखरच निवडणुकीत उतरतात की समर्थकांच्या मागणीनंतरही ते तटस्थ भूमिका घेतात, हे काही दिवसांत स्पष्ट होईल. पण एकंदरीत पाहता, आळंदी नगरपरिषद निवडणूक आता अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.