प्रभात वृत्तसेवा आळंदी – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नगरीत नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत कुर्हाडे यांनी संपूर्ण आळंदीत प्रचार व भेटीगाठींचे वादळ निर्माण केले आहे. ’सुशासन, स्मार्ट सुविधा आणि संतपरंपरेला अनुरूप’ आळंदी उभारण्याचा ठाम संकल्प घेऊन कुर्हाडे यांचा प्रचार रथ सातत्याने फिरत आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी सकारात्मक चर्चांना उधाण आले आहे. प्रशांत कुर्हाडे हे केवळ प्रचार रथावर अवलंबून न राहता, स्वतः प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. या ’घर-घर संवाद’ मोहिमेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, शहरातील निवडणुकीचा ’ताप’ चांगलाच वाढलेला जाणवतो. महिला बचतगट, तरुण आणि व्यापारी वर्गाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.कुर्हाडे यांनी त्यांच्या संवादयात्रेमध्ये आळंदीच्या प्रमुख समस्यांवर स्पष्ट आणि कृतीशील भूमिका मांडली आहे. ’संतनगरीचा विकास हा राजकीय अजेंडा नसून सामाजिक बांधिलकी आहे, ’ या त्यांच्या भूमिकेने मतदारांना आपलेसे केले आहे. यात्राकाळातील सुविधा, वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना, प्रदक्षिणा मार्गासाठी स्वतंत्र ‘ट्रॅफिक प्लॅन’ आणि वारकर्यांसाठी कायमस्वरूपी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आणि मेडिकल हेल्प पॉईंट्सची निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थेचे अद्ययावतीकरण आणि नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे वाढीव जाळे आणि तरुणांसाठी कौशल्यविकास केंद्रे व रोजगारनिर्मितीचा रोडमॅप त्यांनी नागरिकांसमोर ठेवला आहे. या सर्वसमावेशक विकास आराखड्यामुळे, प्रशांत कुर्हाडे यांच्या नेतृत्वाखाली आळंदीत ’विकासपर्वा’ची सुरुवात होईल, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.