आळंदी : माऊलींच्या ७५०व्या जन्मोत्सवानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) श्री क्षेत्र आळंदी देवाची (पुणे) येथे भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैशाख शुद्ध ६, शनिवार ३ मे २०२५ ते वैशाख शुद्ध १३, शनिवार 10 मे २०२५ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि समस्त आळंदी ग्रामस्थांनी महाराष्ट्रातील तमाम भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींच्या जन्मोत्सवाचा आनंद लुटण्याचे सस्नेह निमंत्रण दिले आहे.
ज्ञानेश्वरी पारायणाचा भव्य सोहळा –
या आठ दिवसीय सोहळ्यात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण होणार असून, भाविकांना माऊलींच्या चरणी भक्ती अर्पण करण्याची संधी मिळणार आहे. आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान असलेले पवित्र तीर्थक्षेत्र असून, या सुवर्ण महोत्सवामुळे येथील धार्मिक वातावरण अधिकच उल्हासित होणार आहे.
सहभाग कसा घ्यावा?
पारायणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी आपले नाव नोंदणीसाठी +91 70206 56809 या व्हाट्सअॅप क्रमांकावर टाइप करून पाठवावे. आयोजकांनी सर्वांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पारायणासाठी सहभागी झालेल्या भाविकांची देवस्थानतर्फे निशुल्क निवास, भोजन व्यवस्था केली जाणार आहे.
भाविकांसाठी खास संधी-
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी ग्रामस्थांनी या सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप देण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. या भव्य आयोजनामुळे आळंदी पुन्हा एकदा भक्ती आणि अध्यात्माच्या रंगात न्हाऊन निघणार आहे.






