भर पावसात आळंदीत नगरप्रदक्षिणा

पिंपरी -कार्तिकी द्वादशीला वरुणराजाने अलंकापुरीत हजेरी लावली असून, त्यामुळे वातावरणातील गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर भर पावसातही वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात “माऊली-माऊली’चा जयघोष करत नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर अनेक भाविकांनी खासगी वाहनांमधून परतीचा प्रवास सुरू केला आहे.
शहरात दाखल झालेल्या शेकडो दिंड्यांच्या नगर प्रदक्षिणेमुळे कार्तिकी एकादशीला अलंकापुरीत भक्तीरसाचा सागर उचंबळून आला होता. अलंकापुरी व परिसरातील धर्मशाळा व राहुट्यांमधून होत असलेल्या हरिनामाच्या जयघोषाने सर्वत्र भक्तीमय वातावरण होते.
एकादशी संपून द्वादशी सुरू होताच बुधवारी (दि.1) पहाटे वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. राहुट्यांमधील वारकऱ्यांनी धर्मशाळा व अन्यत्र असरा घेतला. पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने काही वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.
तर द्वादशीला व्यवसाय होण्याच्या आशेवर असलेल्या व्यावसायिकांच्या पदरी मात्र निराशा पडली. पत्राशेड, प्लॅस्टिक कागद अथवा ताडपत्री असलेल्या व्यावसायिकांना पावसाचा फारसा फटका बसला नाही. मात्र गिऱ्हाईकांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला. पावसामुळे पथारी व्यावसायिकांना तर गाशा गुंडाळण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. एकादशीला झालेल्या आर्थिक उलाढालीवरच त्यांना समाधान मानावे लागले.
द्वादशीला घरी परतणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. रिक्षा व खासगी वाहनांच्या माध्यमातून काटेवस्ती येथील पीएमपी बस स्थानकावर पोचण्यासाठी भाविकांची धडपड दिसून आली. तर वारीसाठी दुचाकीवरुन आलेले भाविक पावसामुळे अडकून राहिले. पावसाची रिमझिम व वातावरणातील गारठा वाढल्याने मुख्य रस्ते वगळता अन्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.





