आळंदी शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर

आळंदी – आळंदी शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत निवडणुक पार पडणार आहे.
नगरपरिषद मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी शहर पथविक्रेता समितीच्या एकूण 20 सदस्यांपैकी 8 सदस्य हे शहरातील नोंदणी कृत 365 पथ विक्रेत्यांकडून निवडायचे आहेत. सदर निवडणुकीपूर्वी मंगळवारी (दि. 27) आळंदी नगरपरिषद कार्यालयात आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. यावेळी एकूण 8 जागांपैकी 3 जागा महिला पथ विक्रेत्यांकरिता आरक्षित आहेत. अल्प संख्यांक महिलांसाठी 1, इतर मागास प्रवर्ग महिला 1 आणि खुला प्रवर्ग महिलासाठी 1 यानुसार आरक्षण निश्चित झाले आहे.
आरक्षण सोडत कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी आळंदी शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सदर निवडणुका 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहेत.





