Alandi Bus Stand: आळंदी बसस्थानकाची दुरवस्था! पहिल्याच पावसात प्रवाशांचे अतोनात हाल, पाहा काय घडलं?
Alandi Bus Stand: आळंदी आणि परिसरात पहिल्याच जोरदार पावसानंतर चिखल आणि पाण्याचे साम्राज्य; ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल.

Alandi Bus Stand – येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस स्थानक परिसरात पहिल्याच जोरदार पावसानंतर चिखल आणि पाण्याचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मूलभूत सुविधांचा अभाव आणि अपुरी व्यवस्था यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आळंदीतील देहू फाटा वाय-जंक्शन परिसरातील एसटी महामंडळाच्या जागेचा तात्पुरत्या स्वरूपात पीएमपीएमएल बस स्थानक म्हणून वापर केला जात आहे.
पुण्याकडे जाणार्या सर्व पीएमपीएमएल बसेस याच ठिकाणाहून सुटतात. मात्र या जागेवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना बसण्यासाठी बाके, उभे राहण्यासाठी निवारा शेड, पुरेसा प्रकाश, पावसापासून संरक्षण किंवा स्वच्छ पादचारी मार्ग यांसारख्या सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना रोजच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
त्यातच मंगळवारी दुपारनंतर आळंदी आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. सर्वत्र चिखल, पाण्याची डबकी आणि निसरडा रस्ता निर्माण झाल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून ये-जा करावी लागली. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांसह प्रवास करणार्या पालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
अनेकांना चिखलातून मार्ग काढत बसपर्यंत पोहोचावे लागले, तर काही प्रवासी घसरून पडण्याच्या भीतीने ताटकळत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बस स्थानकासाठी वापरल्या जाणार्या जागेचे योग्य नियोजन न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी अवस्था असेल तर पुढील काही महिन्यांत प्रवाशांची गैरसोय आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तातडीने निवाराशेड उभारा
प्रवाशांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे तातडीने निवारा शेड उभारण्याची, परिसरात खडी टाकून सपाटीकरण करण्याची, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्याची आणि प्रकाशयोजना सुधारण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.





