आळंदी : हरिपाठ उद्यान, पार्किंग आणि पंप हाऊसवर ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर

आळंदी – आळंदी नगरपरिषदेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत हरिपाठ उद्यान, वाहनतळ आणि जलशुद्धीकरण केंद्रावर एकूण ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. नव्याने सुरू झालेल्या हरिपाठ उद्यानात लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
याशिवाय, नगरपरिषदेच्या वाहनतळावरही ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी यापूर्वी चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे वाहनांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. आता कॅमेऱ्यांमुळे पार्किंगमधील वाहनांची संख्या आणि हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
तसेच, आळंदी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावरही १६ सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. आळंदी नगरपरिषदेच्या या पावलामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे.





