अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात एटीएसने अल-कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेशी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. एटीएसचे डीआयजी सुनील जोश यांनी याबाबत माहिती दिली. त्यापैकी दोघांना गुजरातमधून, एकाला दिल्लीतून आणि एका दहशतवाद्याला नोएडामधून अटक करण्यात आली आहे. हे चौघेही अल-कायदाच्या विचारसरणीचा प्रचार करत होते. हे दहशतवादी बऱ्याच काळापासून सक्रिय होते. गुजरात एटीएसला एक गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसने तपास सुरू केला. योग्य कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. एटीएसच्या मते, ते सोशल मीडियाद्वारे त्यांच्या गटात लोकांना जोडत होते आणि त्यात अल-कायदाचा प्रचार करत होते. ही माहिती मिळाल्यानंतर गुजरात एटीएसने झिशान, फरदीन, सैफुल्ला आणि फारिक यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वय २० ते २५ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. हे दहशतवादी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते असा दावा केला जात आहे. संशयित दहशतवाद्यांना वेळीच अटक करण्यात आली असल्यामुळे एटीएसची ही कारवाई एक मोठे यश असल्याचे मानले जाते आहे.