सुपरफास्ट कामासाठी ओळखला जात आलेला अभिनेता अक्षय कुमार हा एका पाठोपाठ एक चित्रपट साइन करत आहे. त्याच्याकडे सध्या एकूण 10 चित्रपट असल्याचे समजते. करोना काळात अन्य कलाकार काम करण्यास धजावत असताना अक्षय कुमारला करोनाही रोखू शकलेला नाही.
आता अक्षय कुमार एक कॉमेडी चित्रपट करणार असून चित्रपट निर्माता मुदस्सर अझीझ यांना होकार दर्शविला आहे. मुदस्सर अझिझ यांनी “हॅप्पी भाग जाएगी’ आणि “पती, पत्नी और वो’ नामक यशस्वी चित्रपट दिलेले आहेत.
मुदस्सर यांनी अक्षय कुमारला चित्रपटाची स्क्रिप्ट वाचून दाखविली असून अक्षयने त्यांना तातडीने होकार दिला आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी जुलै महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. अक्षय कुमार हा सामाजिक, ऍक्शन आणि कॉमेडी चित्रपटांचे संतुलन राखत असल्याचे दिसून येत आहे. अक्षयच्या मते चाहत्यांसमोर विविधांगी भूमिकेतून गेल्यास चित्रपटाला चांगले यश मिळते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अक्षय कुमारचा “लक्ष्मी’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. राघव लॉरेंसद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसह कियारा आडवाणी, राजेश शर्मा, शरद केळकर आदी कलाकारांनी मुख्य भूमिका
साकारल्या आहेत.