Akshaya Tritiya 2026 – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली असून शहरात नव्याने ७ हजार ५७९ वाहनांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ४ हजार ९९२ दुचाकी असून आकडेवारीनुसार अजूनही दुचाकीची पुण्यात मोठी क्रेझ असल्याचे दिसते. गतवर्षीपेक्षा यंदा दुचाकीची विक्री २७३ ने जादा झाली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा या शुभ मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असते. या दिवशी वाहन किंवा वस्तू खरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत अनेकजण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यंदा अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर वाहन घरी नेण्यासाठी नागरिक अगोदरपासूनच बुकिंग करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहनविक्रेत्यांकडून यंदाही अनेक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे १२ ते ते १९ एप्रिल या आठ दिवसात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ७ हजार ५७९ वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये ४ हजार ९९२ दुचाकी तर एक हजार ९७३ कारची संख्या आहे. यानंतर रिक्षा आणि इतर वाहनांचा समावेश आहे. वाहन खरेदीसाठी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी यंदा वाहन विक्रेत्यांनी आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. दुचाकीवर हेल्मेट, अॅक्सेसरीज मोफत देवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांनीही त्याला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. गतवर्षी २३ ते ३० एप्रिल या आठ दिवसात ८ हजार २९८ वाहनांची नोंद झाली होती. यंदा गतवर्षीपेक्षा तुलनेने नवीन वाहन खरेदीत काहीशी घट झाल्याचे दिसून येते. इव्हीची घसरण गतवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ८९३ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा थेट ३०६ वर घसरला आहे. चार्जिंग सुविधा, किंमत, अनुदानातील बदल आणि पारंपरिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल यामुळे ई-वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदा इलेक्ट्रीक वाहनांमध्ये २२८ दुचाकी आणि ७९ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.