Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या आणि विनोदी प्रश्नांमुळे चर्चेत आला आहे. याआधी २०१९ मध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले होते की, “आपल्याला आंबे कसे खायला आवडतात?” आणि हा प्रश्न सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तसाच गंमतीशीर प्रश्न विचारला आहे. फडणवीसांशी हलक्या -फुलक्या गप्पा FICCI Frames 2025 या कार्यक्रमात अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या संवादादरम्यान दोघांमध्ये मजेशीर चर्चा रंगली. अक्षयने सांगितले, “सर, मी मोदीजींना एकदा विचारलं होतं की तुम्ही आंबे कसे खाता, तेव्हा लोकांनी माझी खिल्ली उडवली. पण मी सुधारणार नाही.” यानंतर त्याने नागपूरच्या प्रसिद्ध संत्र्यांचा उल्लेख करत विचारले, “सर, तुम्हाला संत्री आवडतात का?” फडणवीसांनी होकार दिल्यावर अक्षयने पुढे विचारले, “मग तुम्ही ती सोलून खाता की रस काढून?” त्याने पुढे एक खास नागपुरी पद्धतही सांगितली, “संत्रं न सोलता अर्धं कापा, त्यावर थोडं मीठ टाका आणि आंब्यासारखं खा. ही स्टाइल फक्त नागपूरकरांना माहिती असते!” ‘नायक’ चित्रपटाने दिली प्रेरणा संवादादरम्यान जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आलं की कोणता चित्रपट त्यांना राजकारणी म्हणून प्रेरणा देतो, त्यांनी एस. शंकर दिग्दर्शित ‘नायक’ या चित्रपटाचं नाव घेतलं. ते म्हणाले, “‘नायक’ या चित्रपटाने मला खूप प्रभावित केलं. तो फक्त राजकारणासाठी नव्हे, तर मानवी भावना आणि संवेदना दाखवणारा चित्रपट आहे.” अनिल कपूरवरही टोमणा फडणवीस हसत म्हणाले, “लोक मला नेहमी सांगतात, ‘नायकसारखं काम करा, बघा एका दिवसात किती बदल झाले!’ मी एकदा अनिल कपूरला विचारलं होतं, ‘तुम्ही नायक का बनवलात? लोकांना वाटलं तुम्ही नायक आणि आम्ही नालायक!’ एका दिवसात इतकं सगळं कसं शक्य आहे?” अक्षय कुमार आणि फडणवीस यांचा हा संवाद उपस्थितांना हसवून गेला. राजकारण आणि मनोरंजन या दोन वेगळ्या विश्वातला हा हलका, विनोदी संवाद सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे.