योगींच्या मंत्रिमंडळातील दुसरा मंत्री गळाला लागल्यानंतर अखिलेश यादव म्हणतात…

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच राज्यात सत्ताधारी भाजपला जोरदार धक्के बसताना दिसत आहे. आज (बुधवारी) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री दारा सिंह चौहान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या २४ तासांमधील हा दुसऱ्या मंत्राच्या राजीनामा ठरला आहे. चौहान यांच्यापूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा व भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते. ही घटना ताजी असतानाच चौहान यांच्या रूपाने योगी आदित्यनाथ यांना दुसरा धक्का बसला आहे.
दरम्यान, चौहान यांच्या राजीनाम्यानंतर ते देखील समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच आता समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी दारा सिंह चौहान समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार शक्यतांवर शिक्कामोर्तब केले आहे. यादव यांनी याबाबत ट्विट करत चौहान यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत असल्याचा संदेश दिला.
काय म्हणाले अखिलेश यादव?
चौहान यांच्या राजीनाम्यानंतर अखिलेश यादव यांनी ट्विट करत, “सामाजिक न्यायाच्या संघर्षातील सेनानी दारा सिंह चौहान यांचे सपामध्ये सम्मानपूर्वक स्वागत व अभिनंदन. समाजवादी पक्ष व मित्र पक्ष एकत्रित मिळून सामाजिक न्यायाच्या या लढ्याला उंचीवर घेऊन जातील. समाजातील भेदभाव मिटवून टाकू हा आपला सर्वांचा संकल्प आहे. सगळ्यांचा सन्मान-सर्वाना स्थान” असा संदेश दिला आहे.
आमची लढाई सोपी झाली…
दरम्यान, एका वृत्तसंस्थेशी बोलताना अखिलेश यादव यांनी, “राज्यातील जनता द्वेषाच्या व नकारात्मक राजकारणाला कंटाळली आहे. समाजवादी पक्ष सर्वांना एकत्र घेऊन पुढे चालत आहे. मला हे सांगायला आनंद होतोय की, जेव्हा स्वामी प्रसाद मौर्य सपामध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत लोक आमच्यासोबत आले. यामुळे आमची लढाई आणखीनच सोपी झाली.” असं वक्तव्य केलं.





