लखनौ : महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची खोटी आकडेवारी उत्तरप्रदेश सरकारने दिली, असा आरोप समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी केला. त्यासाठी त्यांनी एका बातमीचा आधार घेतला. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये काही महिन्यांपूर्वी महाकुंभ मेळा संपन्न झाला. त्यावेळी २९ जानेवारीला चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये ३७ जण मृत्युमुखी पडल्याची सरकारी आकडेवारी देण्यात आली. प्रत्यक्षात चेंगराचेंगरीमध्ये ८२ जण मृत्युमुखी पडल्याचा दावा एका वृत्तामध्ये करण्यात आला आहे. त्याचा आधार घेऊन अखिलेश यांनी उत्तरप्रदेश सरकार आणि सत्तारूढ भाजपला घेरले. खोटे आकडे देणाऱ्या भाजपवर विश्वासही विश्वास ठेवणार नाही. प्रश्न केवळ आकडे दडवण्याचा नाही. विधानसभेच्या पटलावर खोटे बोलण्याचाही आहे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला. अखिलेश यांनी मृतांच्या कुटूंबीयांना आर्थिक भरपाई देण्याच्या प्रक्रियेविषयीही विविध प्रश्न उपस्थित केले. भरपाई रोख स्वरूपात का देण्यात आली? ती रोकड आली कुठून? ज्यांच्यापर्यंत भरपाई पोहचू शकली नाही; ती परत कुणाच्या हातात गेली? रोख रक्कम देण्याचा निर्णय कुठल्या नियमांतर्गत, कुणाच्या आदेशावरून घेण्यात आला? त्याविषयीचा लेखी आदेश कुठे आहे? रोकड वाटपात कुठली अनियमितता झाली का, आदी सवाल त्यांनी केले.