समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल यांनी या मुद्द्यावरून अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत त्यांनी माफी मागावी तसंच चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी जयकुमार रावल यांनी केली आहे. काय म्हणाले अखिलेश यादव ? मागच्या काही महिन्यांपासून अनेक मोठ्या महापुरुषांवर वक्तव्य करणे जणू काही फॅडच बनला आहे. राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्यानंतर आता सपा नेते अखिलेश यादव यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाबाबतच्या एका घटनेबद्दल वक्तव्य केले. ‘शिवाजी महाराज का तिलक उनके पैर के अंगूठे से किया गया था.’असे वक्तव्य केले. भाजपने घेतला आक्षेप अखिलेश यादव यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा हे षडयंत्र असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. जयकुमार रावल यांनी केली अटकेची मागणी ‘इतिहासाशी छेडछाड स्वीकार केली जाणार नाही. भाजप छत्रपती शिवाजी महाराजांना मानते, त्यांचा सन्मान करते, त्यामुळे अखिलेश यादव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागितली पाहिजे, तसंच चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी जयकुमार रावल यांनी केली आहे.