Akbaruddin Owaisi : राज्यातील पक्ष केवळ सत्तेचे भुकेले; अकबरुद्दीन ओवैसी यांची टीका
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आपली विचारसरणी पूर्णपणे बाजूला ठेवली असून त्यांना केवळ सत्तेची लालसा आहे, असा थेट आरोप एआयएमआयएमचे नेते आणि तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते.
ओवैसी म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलून विचारसरणीचा अभाव स्पष्ट केला आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी युती केली, नंतर अजित पवार भाजपसोबत गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक गट भाजपशी जोडला गेला. आता या पक्षांना धर्मनिरपेक्षता किंवा हिंदुत्वाशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना फक्त सत्ता हवी आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, एआयएमआयएम मुस्लिमांसह दलित व मागास समुदायांसाठीही आवाज उठवत आहे. हा देश टोपी घालणाऱ्यांचाही आणि कपाळावर टिळा लावणाऱ्यांचाही तितकाच आहे, असे त्यांनी नमूद केले.
विकासाच्या अपेक्षेने पाठिंबा मात्र…
ओवैसी यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाने स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या सरकारांना विकासाच्या अपेक्षेने पाठिंबा दिला. मात्र, आज मुस्लिम समाज शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगतीत मागे आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले. सलग सरकारांनी मुस्लिम आणि मागास घटकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, मराठा समाजासह संपूर्ण मराठवाडा विभागाच्या मागासलेपणाच्या विरोधात एकत्र लढण्याचे आवाहन त्यांनी केले.




