लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे भाचे आकाश आनंद यांचे राजकारणात पुनरागमन होते आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मायावती यांनी अचानक आकाश आनंद यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि आपले राजकीय उत्तराधिकारी या दोन्ही पदांवरून हटवले होते. मात्र आता उत्तराखंड आणि पंजाब या दोन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांच्या माध्यमातून त्यांना पुन्हा राजकारणात लॉंच करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांत जाणाऱ्या स्टार प्रचारकांच्या यादीत मायावती यांच्यानंतर आकाश आनंद यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीच्या वेळी अचानक आकाश यांची उचलबांगडी करून मायावती यांनी सर्वसामान्य नागरिकांसोबतच राजकीय जाणकारांना चकित केले होते. मात्र आता पुन्हा दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांना पक्षाचे प्रभारी करण्यात आल्यामुळे आकाश यांची राजकीय सक्रियता वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.