पुणे जिल्हा | अजितदादा, शरद पवार पक्षांचे चिन्ह लावणे…

बारामती, {प्रमोद ठोंबरे} – विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या असताना बारामती विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभेचे निकाल नंतर बारामती विधानसभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघावर अजित पवार यांचा प्रभाव आहे.
1 लाख 65 हजार मतांनी ते गेल्या निवडणुकीत विजय झाले होते. यंदाची परिस्थिती मात्र वेगळी आहे. शरद पवार गटाकडून देखील बारामती मतदारसंघात जोरदार तयारी सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काहि दिवसांतील व्यक्तव्यामुळे अजितदादांना पुन्हा पराभवाची भीती वाटते आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अजित पवार यांच्या जनसमान यात्रेनंतर युगेंद्र पवार यांनी देखील बारामती तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत. बारा दिवसांचा दौरा त्यांनी आखला आहे. मतदारसंघ पिंजून काढण्याचे त्यांनी ठरविले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील विधानसभेसाठी बारकाईने लक्ष घातले की दिसून येत आहे. गाठीभेटींवरती भर दिला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, त्यांचे चिरंजीव जय पवार तसेच पार्थ पवार देखील बारामतीचे दौरे करीत आहेत.
जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून त्यांनी बारामतीत शक्ती प्रदर्शन घडून आणले आहे. असे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून, उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
बारामतीत एवढी कामे करूनही जर गमती केल्या जात असतील, तर आपली झाकली मूठ सव्वालाखाची, असे अजित पवार म्हणाल्याने विधानसभेच्या रिंगणात दादा नसतील तर काय? या विचाराने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फोडून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना आव्हान देत महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी लोकसभेला पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी दिली. मात्र, सुप्रिया सुळे यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
शरद पवार यांनी मुत्सद्देगिरीने घरच्या मैदानावर अजित पवार यांना जोरदार धक्का दिला. ज्या बारामतीवर अजित पवार यांचा विश्वास होता, तेथेही सुनेत्रा पवार या 48 हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी बारामतीतून उच्चांकी 1 लाख 65 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवत इतर गतसर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले होते. बारामतीवर त्याचमुळे अजित पवार यांचा मोठा विश्वास होता. तेथेच त्यांना लोकसभेला मोठा दणका बसला.
या धक्क्यातून अजित पवार अद्यापही सावरलेले दिसत नाहीत. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यातशरदचंद्र पवार गटाने आत्तापासूनच कामाला सुरुवात केली आहे.
अजित पवार यांच्यावर त्यांच्या पक्षाची व राज्याची जबाबदारी आल्याने यापूर्वीच्या तुलनेत बारामतीत त्यांना लक्ष घालताना वेळेची मर्यादा येत आहे.
अजितदादांना अडकवून ठेवण्याचे प्लॅनिंग?
बारामतीच्या जागेवरच अजित पवार यांना अडकवून ठेवण्याचे प्लॅनिंग शरद पवार यांच्याकडून केले जात आहे. त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र हे त्यासाठी तयारीला लागले आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्यातील दौरे वाढविले आहेत. एकूणच वातावरण बघता, यंदाची निवडणूक इतर वेळेसारखी एकतर्फी होणार नाही, हे दिसून येत आहे.
अजित पवार यांनीही मी आजवर लाखाच्या मताधिक्याने विजयी होत आलो. दुसरा आमदार झाल्यावरच तुम्हाला माझ्या कामाची किंमत कळेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे तेही मताधिक्याबाबतीत साशंकच असल्याचे दिसून येत आहे.
तर अजित पवार यांनी आपल्या वक्तव्यातून उमेदवारीचा चेंडू आता कार्यकर्त्यांच्या कोर्टात टोलवत भावनिक साद घातली आहे. कार्यकर्ते आता त्यांना कशी साथ देतात, यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत.
तर काटे की टक्कर
अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामतीतील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती विधानसभेत पुन्हा काका पुतणे भिडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र दोघांनाही निवडणूक सोपी असणार नाही. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर होणार असे चित्र आहे.





