NCP Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

फलटण – अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी दीपक चव्हाण याना फलटण मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर केली होती. असे असताना देखील दीपक चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे.
यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, आपल्याला महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली, असे म्हणत शरद पवारांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, स्वतःच्या बहिणीबद्दल आस्था असतेच. मागे कधी बहीण आठवली नाही.
पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही. लोकसभेला जेव्हा पराभव झाला तेव्हा बहिण आठवली. बारामतीकर लय हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. प्रचाराला गेलो की लोक गप्प बसायचे. इतक्या वर्षाचे संबंध होते, जीवाभावाचे होते. पण बारामतीकरांना मताच्या स्वरूपात बहिणीला पाठिंबा दिला.
शरद पवार पुढे म्हणाले, मला 60 वर्षात एकदाही सुट्टी दिली नाही. मला 4 वेळा मुख्यमंत्री केले. महाराष्ट्राचा चेहरा बादलायचा माझी नैतिक जबाबदारी आहे. चुकीच्या हातात सत्ता आहे. महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत.
शाळेत मुलींवर अत्याचार होत आहेत. काल एका माजी मंत्र्याची हात्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणी सुरक्षित नाहीत, असे शरद पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आपल्याला लांब जायचे आहे. या तुतारीने संबंध देशात आवाज आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.





