Pravin Tarde : मराठी सिनेसृष्टीत आशयघन आणि वास्तववादी सिनेमांची वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2 ) च्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भविष्यात बायोपिक करायचा झाला, तर तो अजित पवार यांच्यावरच करेन, अशी इच्छा व्यक्त केली आहे. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न , धर्मवीर आणि धर्मवीर २ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमधून प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी छाप पाडली केली आहे. ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव आणि दमदार संवादशैली ही त्यांच्या सिनेमांची खास ओळख मानली जाते. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत बोलताना प्रवीण तरडे यांनी सांगितले की, ‘धर्मवीर’नंतर अनेक राजकीय नेते आणि पुढाऱ्यांकडून त्यांना बायोपिकसाठी ऑफर्स आल्या होत्या. काहींनी कोऱ्या चेकपासून मोठ्या बजेटपर्यंतच्या ऑफर दिल्या, मात्र त्यांनी त्या सर्व प्रस्तावांना नकार दिला. प्रवीण तरडेंनी व्यक्त केली इच्छा (Pravin Tarde) “मी प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारला मी हे मनापासून करू शकतो का? आनंद दिघे साहेबांवर सिनेमा केल्यानंतर पुन्हा कुणावर चरित्रपट करायचा नाही, असं मला वाटलं होतं. कारण तो सिनेमा माझ्यासाठी केवळ चित्रपट नव्हता, ती भावनिक जबाबदारी होती.” मात्र, भविष्यात पुन्हा एखादा बायोपिक करायची वेळ आलीच, तर तो अजित पवारांवर असेल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच बोलताना अजितदादांविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Pravin Tarde : अजित पवारांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर? प्रविण तरडे म्हणाले “भविष्यात बायोपिक करायचा झाला, तर…” “अजितदादांना मी जवळून पाहिलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धत अनुभवली आहे. सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा मंत्री मी त्यांच्या रूपात पाहिलाय. मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही त्यांच्या पावलांची सवय झाली असेल,” अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, वेग, कामाचा ध्यास आणि दबाव हा सिनेमासाठी प्रभावी विषय ठरू शकतो.” दरम्यान, प्रवीण तरडे यांचा आगामी देऊळ बंद २ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट देऊळ बंद या सिनेमाचा सीक्वल असून, येत्या २१ मे दिवशी प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : Abhishek Bachchan : KING च्या सेटवरुन आणखी फोटो व्हायरल! नवीन फोटोंमध्ये अभिषेक बच्चनचा दमदार लूक समोर