भोर (पुणे) : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज भोर येथे झालेल्या प्रचारसभेत आपल्या “तिजोरीची चावी माझ्याकडे आहे” या विधानावर हसत-हसत बाजूला सारले आणि भाजपाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर नाव न घेता बोचरे वार केले. “मी ओघानं बोललो होतो, पण लगेच मीडियावाले आले.” असं म्हणत अजितदादांनी हसून विषय मारला. नंतर गंभीर होऊन ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचे अधिकार माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत. मी फक्त अर्थखाते सांभाळतो.” असंही अजित पवार यांनी म्हटले. पुढे म्हणाले. आम्हाला पदे पुणे जिल्ह्यामुळे मिळालेली आहेत. यामुळे याची जाणीव राखत आम्हाला या जिल्ह्यात कामे केली पाहिजेत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. त्यामुळे आम्हाला जनतेच्या पाठिंब्यामुळे राज्यातील सत्तेत महत्त्वाची पदे मिळाली. त्याची परतफेड म्हणून आम्हाला मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याची संधी द्या. आम्ही बारामती नगरपालिका, पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा कायापालट केलेला आहे. तशी विकासकामे करू, अशी ग्वाहीही पवार यांनी यावेळी दिली. एमआयडीसी हा भोरसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु काही लोकांना एमआयडीसी नको, असा टोला कुणाचेही नाव न घेता विरोधकांना लगावला. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.