बारामती/ डोर्लेवाडी -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आघाडी करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना देणार असल्याचे संकेत माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मात्र, त्याचवेळी घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकाबाबत महाविकास आघाडीची भूमिका काय असेल, या प्रश्नावर पवार म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे.
सद्यस्थितीत राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र असून सरकार चालवत आहे. महाविकास आघाडीत राज्य स्तरावरच्या आणि इतर महत्वाच्या निवडणुका लढवण्याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवरचे नेते घेतात.
जिल्हा आणि शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत त्या त्या जिल्ह्यात अधिकार देणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ आम्ही सर्वजण बैठक घेऊन निवडणुकांबाबत दिशा ठरवू.