मुंबई : सध्या राज्यात भाजप शिवसेनेत सत्तेच्या वाटाघाटीवरून जोरदार रस्सी खेच सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावल्याने राजकीय चर्चाना उधाण आले होते. ही बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेला धक्का देणारे विधान केलं आहे. अजित पवार म्हणाले की, “सत्ता स्थापनेला उशीर होत असल्याने शिवसेना भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतेय. त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीला जनमतात बसण्याचा कौल मिळाला असून, ज्यांना जनतेने कौल दिला त्यांनी सरकार स्थापन करावं” असे अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या दबावाच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येवून सत्तास्थापन करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जातेय. त्या अनुषंगाने काँग्रेसची नेतेमंडळी शुक्रवारी सोनिया गांधींच्या भेटीसाठी गेले होते. परंतु सोनिया यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली असून, राष्ट्रवादीही शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता नसल्यचा अंदाज शनिवारच्या बैठकीनंतर व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही तातडीची बैठक बोलावली होती. परंतु त्यांनी यापूर्वीच शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळली होती. त्यामुळे आता नेमकं राजकीय गणित कशी जुळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.