Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. मात्र त्यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या कठीण प्रसंगी राज्य सरकारने तीन दिवसांचा 28 ते 30 तारखेपर्यंत शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र या दुखवट्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना मोठ्या नेत्याचे निधन झाल्याचा प्रसंग या आधी उद्भवलेला नव्हता. असे पहिल्यांदाच घडत असल्याने सर्व बाबींचा विचार करून गुरुवारी निर्णय घेऊ, असे आयोगाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, निवडणूक आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुका नियोजित वेळेतच पार पडतील. 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आणि 7 फेब्रुवारीची मतमोजणी यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. निवडणूक प्रचार काळात एखाद्या प्रमुख पदावरील व्यक्तीचे निधन झाल्यास निवडणूक रद्द करण्याचा कोणताही स्पष्ट नियम निवडणूक अधिनियमात नाही. 5 फेब्रुवारीला मतदान केवळ संबंधित मतदारसंघातील उमेदवाराचा मृत्यू झाल्यास तिथे निवडणूक स्थगित केली जाते. शासकीय दुखवट्याचा कालावधी 30 जानेवारी रोजी संपत आहे, तर मतदान त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 5 फेब्रुवारीला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तारखा बदलण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीशी संबंधित विविध बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. …तरच तारखांमध्ये फेरबदल केला जातो निवडणूक अधिनियमानुसार, काही विशेष परिस्थितीत मतदानाची तारीख बदलण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने बदल आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाकडे तसा प्रस्ताव पाठवू शकतात. मात्र, असा बदल मतदानाच्या 7 दिवस आधी करणे बंधनकारक असते. जर मतदानाच्या दिवशीच राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर शासकीय दुखवटा असेल, तरच तारखांमध्ये फेरबदल केला जातो. साधारण, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन ते चारच दिवस दिले जातात. यावेळी २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत प्रचार करता येणार आहे. याचा अर्थ प्रचाराला सात दिवस देण्यात आले आहेत. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा ३० जानेवारीपर्यंत होणार नाहीत. तरीही प्रचारासाठी चार दिवस मिळणार आहेत. एवढा कालावधी प्रचारासाठी पुरेसा असल्याने निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी रोजीच घ्यावी, असा विचार आयोग करत आहे. हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash : उद्धव ठाकरे रात्री बारामतीत पोहोचले ; सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांचे केले सांत्वन