नागपूर :- गत काही दिवसांपासून राज्यात अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बंडखोर गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही भर पडली आहे.
त्यांच्या मते, अजित पवार महाराष्ट्रातील वजनदार व लोकप्रिय नेते आहेत. त्यांना एक दिवस निश्चितच मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची संधी मिळेल. त्यांच्या या विधानामुळे यासंबंधीच्या चर्चेला नव्याने फोडणी मिळाली आहे.
पटेल नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सद्यस्थितीत अजित पवार महाराष्ट्रातील एक वजनदार व लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे आज नव्हे तर गत अनेक वर्षांपासून नेतृत्व करत आहेत.
काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळतेच. अनेकांना ती मिळाली आहे. त्यानुसार, अजित पवारांना आज नाही पण पुढच्या काळात केव्हा ना केव्हा निश्चितच संधी मिळेल.
आम्हीही त्या दिशेने काम करू. मुख्यमंत्रिपदाची जागा आज रिकामी नाही. त्यामुळे ती चर्चा कशाला करता? असा उलटप्रश्नही यावेळी पटेलांनी पत्रकारांना केला आहे.