Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पवार यांची उणीव भासणार आहे. ज्या- ज्या वेळी पवार सरकारमध्ये होते, त्या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पवारांकडे राहिले आहे. त्यांच्या काळात पुणे जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांना कायमच गती मिळाली आहे. आता मात्र पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्याची सूत्रे कोणाकडे राहणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असो, महाविकास आघाडीचे सरकार असो किंवा महायुतीचे सरकार असो, या तीनही सरकारच्या काळात पालकमंत्रिपद हे पवार यांच्याकडेच राहिले. पुणे जिल्ह्यावर पकड ठेवायची असेल, तर पालकमंत्रिपद आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत ते काम यशस्वीपणे पवार यांनी पार पाडले. महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुण्याचा पालकमंत्री मीच होणार असून, विकासकामांची यादी तयार ठेवा, अशा शब्दांत पवार यांनी कार्यकत्यांना विश्वास दिला होता.सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यामध्ये पुणे रिंगरोड, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प, मेट्रो मार्गांचा विस्तार, रस्ते रुंदीकरण करणे, चाकण -शिक्रापूर रस्त्याचे विस्तारीकरण, हडपसर ते यवत महामार्गाचे रुंदीकरण, येरवडा ते शिक्रापूर महामार्गाचे विस्तारीकरण, फुरसुंगी ते खडकवासला धरण पाण्यासाठीचा बोगदा प्रकल्प आदी प्रकल्प सुरू आहेत. पवार यांनी या प्रकल्पाला गती देत सातत्याने या कामांवर लक्ष ठेवले. आता पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची नियुक्ती होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.