Ajit Pawar – राज्याच्या राजकारणात गेली चार दशके अग्रभागी राहिलेले आणि पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणारे, अजित पवार यांच्या निधनाने राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अजितदांदाना श्रद्धांजली अर्पण केली. अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वीच आमची भेट झाली होती, असे सांगताना पाटील भावूक झाले. राज्य मंत्रिमंडळामध्ये जवळपास पंधरा वर्षे आम्ही एकत्र काम केले. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक विषयाची त्यांना सखोल जाण होती. निर्णयक्षमता, प्रशासकीय अनुभव आणि जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण यामुळे त्यांच्या कामाची तडफ राज्याने नेहमीच अनुभवली. अभ्यासू वृत्तीच्या बळावर त्यांनी विधिमंडळात आपल्या कामाचा ठसा उमटवला. रोखठोकपणा आणि त्याचबरोबर दिलदार स्वभाव हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते.अजितदादांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विकासाचे स्पष्ट ‘व्हिजन’ त्यांच्याकडे असल्यानेच सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या अनेक योजना राज्यात साकारल्या. ‘काम करणारा माणूस’ ही त्यांची प्रतिमा जनमानसात कायम राहील. एक सक्षम, कणखर आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले, ही हानी महाराष्ट्र कधीही भरून काढू शकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. “छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केलेले, अजितदादा हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याची माहिती असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक होते. जनतेशी व कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. त्यामुळेच त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला तसेच समाजातील सर्वच घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपल्या सत्तेचा सकारात्मक वापर केला.” – हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री