प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे मेट्रोचे भूमिपूजन पुढच्या काळात झाले असले तरी त्याची मंजुरी स्व. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात झाल्याचे सांगत मेट्रोचे श्रेय घेणाऱ्या भाजपेयींना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत टोला लगावला. यावेळी शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख उपस्थित होते. यावेळी ‘एक अलार्म पाच काम’ या संकल्पनेचे उद्धाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये कचरा, वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, पाणीटंचाई, गुन्हेगारी, आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था हे धोक्याचे अलार्म आहेत. हे गाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरते मर्यादित आहे. केंद्र आणि राज्य सरकारशी याचा कोणताही संबंध नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. नसबंदी अपयशामुळे कुत्रे चावण्याच्या हजारो घटना घडल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौटुंबिक आयुष्यावर होत आहे. दोन्ही महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. महापालिकेच्या कामाच्या निविदा रिंग केल्या जातात आणि ठराविक लोकांनाच कामे दिली जातात. बाकीचे लोक निविदा प्रक्रियेत उतरणारच नाहीत अशी तजवीज दबावामुळे केली जाते. याची किंमत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मोजावी लागत आहे, अशी टीका पवारांनी केली.या दोन्ही शहरातील प्रशासनाच्या अपयशी कारभारामुळे वाहतूक कोंडी, खराब रस्ते, कचर्याची समस्या, पिण्याची पाण्याची टंचाई यासारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. टँकर माफियांची गँग झाली आहे. आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. अनेक योजना केवळ कागदावरच आहेत. हजारो सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते, परंतु शहरभर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. याचा अर्थ सांगितले एक जाते आणि केले दुसरेच जाते. आता ही परिस्थिती स्पष्टपणे समोर आली असून, यात नगरिक भरडले जात आहेत, असेही पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीकडून ‘एक अलार्म पाच काम’ ही मोहीम सुरू करण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत एका रॅप साॅंगच्या माध्यमातून शहरातील खड्डे, कचरा, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि पाणीटंचाई या पाच मुद्यांवरून प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली आहे.