Ajit Pawar – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज (गुरुवार, दि. 29) श्रीक्षेत्र कडूस येथे कडकडीत बंद पाळून आणि शोकसभेचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी झालेल्या शोकसभेत उपस्थितांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.माजी सभापती अंकुश राक्षे म्हणाले की, वयाच्या 17 व्या वर्षी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या अध्यक्ष पद देऊन मला संधी देऊन माझा राजकीय प्रवास घडवला केवळ पक्षाच्या सध्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून एक पत्रावर विकासकामांना निधी देणारा एकमेव नेता म्हणजे अजितदादा पवार होते. माझ्या सभापतीपदाच्या काळात, विशेषतः करोनाच्या गंभीर संकटात दादांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. पहाटे 5 वाजता स्वतः उपस्थित राहून विकासकामांची पाहणी करणारा, दूरदृष्ट्री असणारा नेता महाराष्ट्राला लाभलेला हा ’विकासपुरुष’ पुन्हा होणे नाही.राक्षे पुढे म्हणाले की, दादांच्या अशा अचानक जाण्याने खेड तालुका आणि पुणे जिल्हा पोरका झाला आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याची पुढील 20-30 वर्षांची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. आता राष्ट्रवादीच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती ची सत्ता राष्ट्रवादी या विचाराची आणायची आहे हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल.यावेळी कडूस चास जिल्हा परिषदेच्या उमेदवार वसुधा राक्षे बोलताना म्हणाल्या की, आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दादांनी जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. आज आपल्या सर्वांचा हा आधारवड कोसळला आहे. यावेळी शंकर कावडे, प्रियांका देवदरे, अभिनाथ शेंडे, कांचन धमाले, अनिकेत धायबर यांसह कडूस शहर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी साश्रू नयनांनी दादांना अखेरचा निरोप दिला.