Ajit Pawar – अजितदादांचा स्वभाव रोखठोक होता. चांगल्या कामाला चांगले म्हणायचे आणि चूक असेल तर ती कितीही मोठ्या व्यक्तीची असो, ठामपणे सांगायचे. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासाठी मोठ्या नेत्याच्या अंगावर जाणारा नेता म्हणजे अजितदादा, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. ३० जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत मंत्री भरणे बोलत होते.कृषिमंत्री भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील लहान कार्यकर्त्यांनाही अजितदादा नावानिशी ओळखत. त्यांच्या अडचणी समजून घेत, कामे मार्गी लावत. मी मिटिंगला असो वा नसो, इंदापूरचा कोणताही प्रश्न असला तरी दादांनी तो सोडवला. ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल, याचा बारकावा फक्त अजितदादांकडे होता. बारामतीसह इंदापूर शहरासाठी काय करता येईल, हा सातत्याने विचार करणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून असा नेता राज्याला मिळणे अशक्य आहे. आगामी काळात दादांचा दृष्टिकोन, काम करण्याची पद्धत आपण अंगीकारूया आणि पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया, असे आवाहनही भरणे यांनी केले.यावेळी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा असा प्रसंग येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. इंदापूर : येथे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काय बोलावे, श्रद्धांजली कशी अर्पण करावी, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शब्दच सुचत नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व म्हणजे अजितदादा.” दादांसारखा कर्तृत्ववान नेता भविष्यात कधीही होणार नाही. ते आपल्यातून निघून गेले, यावर अजूनही विश्वास बसत नाही. ‘मामा’ आणि आपण एकत्र येण्याची भूमिका देखील दादांमुळेच झाली. घटनेच्या आदल्या दिवशीही माझ्याशी वीस मिनिटे फोनवर बोलले होते,” अशा अनेक आठवणी सांगताना हर्षवर्धन पाटील भावूक झाले.या शोकसभेला जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी उपनगराध्य अरविंद वाघयांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्याला संधी देणारे दादा’ “मी शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता होतो. माझ्या घरात कोणालाही राजकीय वारसा नव्हता. तरीही मला साखर कारखाना, जिल्हा बँक, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आणि थेट कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचवण्यात अजितदादांचा मोठा वाटा आहे. दादांनी एकदा एखाद्यावर विश्वास टाकला की, ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत.” – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री जनतेच्या बळावर दादांचा प्रवास “लोकसभेपासून बारामती मतदारसंघाचे आठ वेळा प्रतिनिधित्व, सहापेक्षा अधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद, गावच्या विकास सोसायटीपासून ते राज्याच्या सर्वोच्च पदांपर्यंतचा ३५ वर्षांचा प्रवास हा सामान्य माणसाच्या बळावर, जनतेच्या आशीर्वादाने दादांनी स्वतःच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रात आगळीवेगळी ओळख निर्माण केली.” – हर्षवर्धन पाटील, माजी सहकार मंत्री